Tuesday, 3 September 2019

मानवी रोग

📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙
*****************************
कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते.
अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे  शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते.
शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो.
मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.

हृदयविकार


  *💥हृदयविकाराचे मर्म💥*

                  रक्तदाबाशी घनिष्ठ संबंध असणारे कोलेस्टेरॉल हे जैवरसायन म्हणजे पेशीपटलाचा एक आवश्यक घटक आहे. कोलेस्टेरॉलची उत्पत्ती यकृतात होते. मात्र शरीराला आवश्यक असणारे हे संप्रेरक शरीरात अनेक ठिकाणी अनावश्यक प्रमाणात गोळा होऊन व्याधींना कारणीभूतही ठरते. १७५८ साली फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ फ्रँकाय पुलेटिए याने पित्ताशयातील विकारांवर संशोधन करताना पित्ताशयातील काही अज्ञात स्वरूपाचे खडे वेगळे केले. यानंतर १८१५ साली मायकेल-युजिन शेव्हरूल या फ्रेंच वैद्यकतज्ज्ञाने पित्ताशयातील या खडय़ांपासून स्फटिकरूपातील, कालांतराने ‘कोलेस्टेरॉल’ या नावे ओळखला गेलेला पदार्थ वेगळा केला. परंतु या कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी असलेला संबंध स्पष्ट होण्यास आणखी एक शतक जावे लागले.मानवी शरीरातील रोहिण्यांत जाडसर पदार्थ जमा होत असल्याचे जर्मन वैद्यकतज्ज्ञांना एकोणिसाव्या शतकातच लक्षात आले होते. १९१० साली जर्मन रसायनतज्ज्ञ अ‍ॅडॉल्फ विंडॉस याने रक्तदाबाची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या रोहिणीच्या आत जमा झालेल्या जाडसर थराचे पृथ:करण केले. त्या थरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे सर्वसाधारण रोहिण्यांतील थरात असणाऱ्या कोलेस्टेरॉलपेक्षा २५ पट अधिक असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर १९१३ साली निकोलाय अनित्शोकॉव या रशियन वैद्यकतज्ज्ञाने सशावर केलेल्या प्रयोगात, सशाला आहारातून शुद्ध कोलेस्टेरॉल दिले. यामुळे सशात रक्तदाबाची लक्षणे निर्माण झाली. यावरून आहारातून येणारे कोलेस्टेरॉल हे, हा थर जमा होण्यामागचे कारण असल्याची शक्यता दिसून आली. सन १९५० मध्ये जर्मनीच्या कोनराड ब्लॉख याने अ‍ॅसिटेटपासून होणाऱ्या कोलेस्टेरॉलच्या रेणूंच्या निर्मितीमागील गुंतागुंतीची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेत अवघे दोन कार्बनचे अणू असणाऱ्या अ‍ॅसिटेटचे बहुवारिकीकरण (पॉलिमरायझेशन) होऊन त्यापासून कार्बनचे २७ अणू असणाऱ्या कोलेस्टेरॉलचे रेणू कसे तयार होतात, हे समजू शकले. यानंतर १९५५ सालच्या आपल्या संशोधनात, अमेरिकेच्या जॉन गॉफमॅन याने, त्या वेळी नुकत्याच उपलब्ध झालेल्या, अतिशय उच्च वेगाने स्वत:भोवती फिरणाऱ्या अपकेंद्री (सेंट्रिफ्यूज) यंत्राचा वापर केला. या यंत्राद्वारे त्याने कोलेस्टेरॉलमधील वेगवेगळी घनता असलेले दोन घटक शोधून काढले. गॉफमॅनच्या संशोधनात, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णांतील रक्तात कमी घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण वाढले असल्याचे व अधिक घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. गॉफमॅनच्या या संशोधनाने कोलेस्टेरॉलवरील प्रगत संशोधनाला मोठी गती मिळाली.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...