Wednesday, 14 April 2021

हृदयाचे कार्य

Human heart
     *ह्रदयाचे कार्य कसे चालते ?* 
***********************************
विहिरीवर पाणी उपसण्यासाठी बसवलेला पंप तुम्ही पाहिला असेल. या पंपामुळे विहिरीतील पाणी उपसले जाते व ते शेतात सोडले जाते. पंपाच्या शक्तीमुळे खोल असलेले पाणी वर खेचले जातेच, पण दाबाखाली नाळांवाटे  दूरवर शेतात सोडलेही जाते. हृदय एखाद्या पंपासारखेच कार्य करते. हृदय स्नायूंचे बनलेले असते. हृदय सामान्यतः आपल्या डाव्या हाताच्या मुठीच्या आकाराइतके मोठे असते. हृदयाचे डावा व उजवा असे दोन भाग असतात. या दोहोंच्या मध्ये स्नायूंचा पडदा असतो. डाव्या बाजूला शुद्ध रक्त तर उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असते. डाव्या व उजव्या भागाचे प्रत्येकी दोन कप्पे असतात. वरच्या कप्प्याला कर्णिका (Atrium), तर खालच्या भागाला जवनिका (Ventricle) असे म्हणतात. कर्णिका व जवनिका यांच्यामध्ये रक्त प्रवाहासाठी झडपा असलेला मार्ग असतो. या झडपांमुळे रक्त कर्णिकेतुन (Artium) जवनिकेत (Ventricle) जाऊ शकते, पण उलटे परत जाऊ शकत नाही.
उजव्या कर्णिकेत (Atrium) शरीराच्या सर्व भागातील अशुद्ध रक्त जमा होते. ते नंतर उजव्या जवनिकेत (Ventricle) जाते. तेथून रक्तवाहिन्यांद्वारे हे रक्त फुप्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी नेले जाते. फुफ्फुसात रक्त शुद्ध होते. शुद्ध झालेले हे रक्त डाव्या कर्णिकेत (Artium) येते व डाव्या कर्णिकेतून डाव्या जवनिकेत जाते. तेथून अनेक धमन्यांद्वारे वा रोहिण्यांद्वारे ते शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवले जाते.
हृदय कायम आकुंचन व प्रसरण पावत असते. दर मिनिटाला सुमारे ७२ वेळा आकुंचन प्रसरण होत असते. हृदय प्रसरण पावल्यावर कर्णिकांमधील (Artium) रक्त जवनिकांमध्ये (Ventricle) येते. आकुंचन पावल्यावर जवनिकांतील रक्त फुफ्फुसात व शरीरभर पोहोचवले जाते. हृदयाचे हे कार्य न थकता, न थांबता अहोरात्र चालूच असते. हृदय काही मिनिटे बंद झाले तरी आपला मृत्यू होते होतो. असे हे हृदय !

Friday, 12 March 2021

जागतिक वनदिन_ २१ मार्च

YouTube link__https://youtu.be/WlLq_F06A5w
२१ मार्च जागतिक वन दिन
   जागतिक वन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
  मानवी जीवनात वनांचे फार मोठे महत्त्व आहे.वनांनी समृद्ध असलेल्या या निसर्गाच्या अविष्कारावरच भव्य रूपके प्राचीन ऋषींनी केली आहेत . निसर्ग व मानव हे भिन्न  नाहीत. आपण या अफाट सृष्टी पासून वेगळे असूच शकत नाहीत.भारतात प्राचीन काळापासून वनांबद्दल आणि वृक्षांबद्दल खूप लिहिलेले आहे. वृक्षप्रेम ,वृक्षपूजा , वृक्षसंवर्धन व वनांची जोपासना ,त्यापासून मिळणाऱ्या अनेक वस्तू पदार्थ यांची योग्य व्यवस्था आणि उपयोगाबद्दल उपनिषदात ,पुराणात लिहिले आहे. भारतीय आयुर्वेदात वृक्ष ,वेली ,कंद, मुळांपासून मिळणार्‍या विविध औषधीद्रव्यांचा उल्लेख आहे .'मुले ही न अनौषधम ' असे म्हटले आहे .आपल्या पूर्वजांनी वृक्षपुजा हे पुण्यकारक कार्य मानले आहे. वृक्ष पुत्रवत असल्याचे स्पष्ट केले आहे .वृक्षवेली व प्राणी भारतीय आणि जगातल्या सर्व संस्कृती निगडित आहेत. गुरुकुल परंपरेत भारतीय मन घडले आहे. वटवृक्ष, पिंपळ ,आवळा, आंबा, तुळस यांची पूजा ही दिनचर्येमध्ये समाविष्ट आहे. वसुबारस, गोवर्धन पूजा, पोळा हे सण प्राणीमात्रांशी प्रेम दर्शवितात.
       वन म्हणजे केवळ वृक्ष समूह नाही, तर अनेक सजीव व निर्जीव घटकांचा वनस्पती, प्राणी ,जिवाणू, कीटक, पक्षी, पाणी, हवा इत्यादींच्या परस्परांवरील परिणामातून व प्रक्रियेतून त्या त्या जागी विशिष्ट वातावरणात निर्माण झालेली एक संघ विस्तृत असा भौगोलिक भाग व्यापणारी, सतत परिवर्तनशील अशी एक पद्धती होय.
         वने म्हणजे नेमके काय? तर प्रशासन आणि कायद्याच्या दृष्टीने वनविभागाकडे असणाऱ्या जमिनींना वन जमीन असे म्हणतात. आपल्याला कागदोपत्री त्या जमिनीची ओळख वन अशी होते .त्या जमिनीवर झाडे असलीच पाहिजेत असे नाही. शास्त्रांमध्ये वनांची व्याख्या अशी करतात की, ज्या भूभागात मोठी झाडे प्रामुख्याने आढळतात अशा अनेक वृक्ष, वेली, वनस्पती गटांनी आच्छादलेल्या विस्तृत क्षेत्राला वन असे म्हणतात. वनात सूर्य किरणही जमिनीवर पोहोचत नाहीत ,अशा घनदाट वृक्षवल्ली ने नटलेली वनराई म्हणजेच वने होय. ही वने म्हणजे केवळ वनस्पती समूह नाही तर  विविध प्रकारच्या, आकारमानाच्या, वयाच्या वनस्पती खेरीज अनेक कीटक ,जंतू ,पशू-पक्षी ,शेवाळी, बुरशी ,गवत असे अनेक सजीव घटक असतात. त्याचबरोबर जमीन ,पाणी ,आद्रता, खडकांचा प्रकार आणि क्षार आणि इतर रासायनिक द्रव्य या सर्वांच्या विशिष्ट अशा वातावरणात त्या सजीव घटकांची वाढ होते ,त्या वाढून स्थिर होतात, नव्या पिढ्यांना जन्म देतात ,नाश पावतात आणि शेवटी कुजून किंवा जळून जमिनीत फार सामावून जातात.
            स्वतःची प्रगती करून घेण्याच्या प्रयत्नात मानवाने वृक्ष व वनांचा उपयोग करून घेतला. पण त्या बरोबरच वनांचे सुयोग्य जतन करण्याचा प्रयत्न नीट केला नाही. आज भारत आणि इतर अविकसित राष्ट्रात वनांचा नाश झाला आहे. त्याचबरोबर हेही स्पष्ट होते की प्रगत व पाश्चिमात्य सुधारित समृद्ध देशांनी आपली वने सांभाळली आहेत .यात अमेरिका, स्वीडन, जपान, कॅनडा, फ्रान्स ,जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया या राष्ट्रात वनांचे प्रमाण आणि त्यांची स्थिती अत्यंत चांगली आहे प्रत्यक्ष वृक्षतोड न करता इतर देशातून वृक्ष आयात करून स्वतःची वने ही सौंदर्य पर्यटन , विरंगुळा इत्यादींसाठी या देशांनी जपली आहेत आणि त्यातूनच मृदसंधारण ,जलसंवर्धन व निर्मळ आणि निकोप वातावरण साधले आहे. त्यांची वन व्यवस्था फार उच्च प्रतीची आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी वनांमध्ये गुंतवणूक केलेली आहे.
        आज भारतातील वने नष्ट होत चालली आहेत. वृक्ष संवर्धनाचे काहीच नियोजन आम्ही केले नाही तर काही वर्षांनी ही सर्व वाहने नष्ट होणार आहेत. मग हीच वने नसले तर काय होईल?त्यातूनच वने घडली आणि मग अनेक सूक्ष्म जंतू आलेत .पुढे पाण्यात राहणारे जलचर प्राणी ,उभयचर प्राणी नंतर सरपटणारे प्राणी त्यानंतर उडणारे प्राणी म्हणजेच पक्षी वर्ग आणि शेवटी सस्तन प्राणी म्हणजेच मानव निर्माण झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
       वृक्षाबद्दल पूर्वजांनी म्हटले आहे की,"परोपकाराय फलंती वृक्ष:"दुसऱ्यासाठी फुले फळे देऊनही झाडे आपल्यावर उपकार करतात. वन ही संपत्ती निर्मितीचे साधन आहे. मानवी जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचे माध्यम आहे तसेच वातावरणाचा समतोल राखण्यात आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीला स्थैर्य देण्याचे कार्य वने करतात . वनांचा हवामानावर होणारा परिणाम हा वनांनी झाकलेल्या जमिनीपेक्षा वन विरहित उजाड प्रदेशांमध्ये प्रकर्षाने जाणवतो . आकाशातून पडणारा पाऊस, दव, बर्फ हे सर्व वनात वनाच्छादित क्षेत्रात लवकर जमिनीत मुरतात.हवेतील दमटपणा राखण्याला जमिनीत पाणी मुरून व धरून ठेवण्याचा वृक्ष मदत करतात. जमिनीची धूप थांबते. जमिनीचा कस वाढतो .वनांवर अनेक कीटक, पशुपक्षी ,वन्य प्राणी यांचे जीवनमान अवलंबून आहे .आपल्या भारतात आदिवासी प्रामुख्याने वनात राहतात त्यांचे जीवन आणि संस्कृती ही ही वंशी निगडित आहे .
           पूर्वी वनांमध्ये शिक्षण होत असे, वनांमध्ये आश्रम होते .गुरुदक्षिणा म्हणून वनातून मिळालेली फुले, फळे शिष्य आपल्या गुरूंना देत असत.  वनातील शिक्षण हेच खरे माणुसकी ,प्रेमभाव ,भूतदया चे शिक्षण होते. रामायणात रामाला वनवास सांगितला आहे ,तो त्याला दिलेली कठोर शिक्षा या स्वरूपाचा आहे. महाभारतातही पांडवाचा वनवास त्याच स्वरूपाचा आहे .अशा रीतीने वन ही जरी शिक्षा भोगण्याची जागा ठरली ,तरी ती आल्हाद किंवा आनंद भोगण्याची ही जागा आहे. वनातील वृक्ष लता जलाशयांच्या आसपासची झाडे-झुडुपे नदी-नाले धबधबे इत्यादी सर्व स्थावर सृष्टी आनंद देणारेच असते. यालाच वनसृष्टी असे म्हणतात. राम-लक्ष्मण व पांडव राज पुरुष होते .राज्य व लोकांचे दुःख त्यांना भोगावे लागले आहे .पण त्या प्रसंगी सुद्धा त्यांनी ते विसरायला लावण्याचे सामर्थ्य त्या वनश्रीत होते .आजही ते सामर्थ्य तसेच आहे, पण मनातला आनंद उपभोगायला आपणास वेळ नसतो ,म्हणून आपण उपवने तयार करतो. उपवने म्हणजे वनांची लहान प्रतिकृती किंवा सुधारित आवृत्ती होय.वनातल्या अडचणी, गैरसोय नाहीसे करून जी वनश्री ची रचना होते तिला उपवन असे म्हणतात. शेती ही सुद्धा उपवन रचनाच आहे. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न ,वस्त्र व निवारा याकरता उपयोगी असलेली वनस्पती सांभाळण्याकरिता जी व्यवस्था करतात, ती शेती होती होय.
        पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच घाटावरील शेती सर्वोत्तम आहे .आज शंभर टक्के लोक स्थानिक देशी झाडे शेतात टिकवून आहेत. कडुलिंब ,पळस ,पांगारा ,आंबा ,काटे शिवार, जांभूळ ,पिंपळ, वड इत्यादी देशी झाडे आहेत. नैसर्गिक जंगले आहेत म्हणून रोगराईचे प्रमाण ही तेथे कमी आहे. सर्व देशी झाडे म्हणजेच पक्षांसाठी तर ज्यूस बारच आहेत. प्रत्येकाच्या दाराशी आंब्याची व जांभळाची झाडे दिसतात. याचा संबंध त्यांच्या आरोग्याशी असून पश्चिम घाटातील लोक निरोगी आहेत. आंबा म्हणजे सर्वगुणसंपन्न असे फळ आहे यातून सर्व विटामिन्स खनिजे व जास्तीत जास्त कॅलरीज मिळतात तसेच जांभळा मध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा गुणधर्म आहे.
       आपले बरेच सण अथवा उत्सव वृक्षवेली निगडित आहेत. गुढीपाडवा या सणाच्या दिवशी कडूलिंबाच्या पानाचा फुलांना महत्त्व असते ,तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अत्यंत महत्त्व असते. कुठल्याही मंगल प्रसंगी घराला आंब्याच्या पानांचे तोरण हवेच असते. तसेच नारळ-सुपारी शिवाय कुठले शुभकार्य जवळ जवळ अशक्यच आहे. नागवेलीची पाने तर प्रत्येक पूजेत असणे गरजेचे आहे असतेच. भारतीय महिला जीवनात वृक्षांना फारच महत्त्वाचे स्थान आहे. वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा भारतीय महिला मनोभावे करीत असतात. वडाच्या झाडाच्या शंभर मीटर परिसरात सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, म्हणून शुद्ध हवेच्या संपर्कात महिलांनी यावे यासाठी पारंपारिक व्रतांचे व सणांची सांगड घालून एक प्रकारे वनसंवर्धनाचे कार्य घडत असते. हरतालिकेच्या दिवशी निरनिराळ्या वृक्षांची पाने वाहण्याचा प्रघात आहे .यातून जणू काही जुने पाने झाडावरून काढून नवे पानं येण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे ,असे विनासायास घडत असते .अशा प्रकारे महिलांनी पक्षांना देव मानले आहे .कारण निसर्गात हीच वृक्षराई आम्हाला सर्व काही देत असते आणि पर्यावरण संतुलन राखण्याचे काम प्रामाणिकपणे करीत असते .पर्यावरण संतुलन राखण्याचे काम महिलाच करीत आहेत. वनसंरक्षनात महिलाच आघाडीवर आहेत. घराच्या दारासमोर तुळस लावलेली असते. नैसर्गिकरित्या तुळस हे लहानसे रोपटे आपल्या श्वासोच्छवासांतून प्राणवायू जास्त प्रमाणात बाहेर सोडते ,त्यामुळे नैसर्गिक रित्या आपल्याला प्राणवायू जास्त प्रमाणात मिळतो व घरातील हवा ही शुद्ध राहते.
          आपला प्राचीन इतिहास पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की महिला ह्या फक्त वृक्षवेलींनी वरच प्रेम करीत नाहीत तर वन्यपशू पक्षांवर ही त्यांचे प्रेम आहे. राजस्थान मधील बिष्णोई ही  जंगलात वास्तव्य करणारी आदिवासी जमात आहे.वनसंपदा व वन्य प्राणी यांचे संरक्षण करणे हा या जमातीचा महत्त्वाचा सिद्धांत. सन १७३० मध्ये जोधपुर चे राजा अभयसिंह यांना त्यांचा राजमहाल बांधावयाचा होता .त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लाकडाची आवश्यकता होती .त्यांनी त्यांचे मंत्री गिरिधरदास यांना लाकूडतोड्यानच्यासोबत झाडे कापण्यासाठी लोकांची वस्ती असलेल्या खेजारली गावात पाठवले . त्या गावातील स्थानिक रहिवासी अमृतादेवी यांना झाडे वाचवायची होती. त्यांनी धावत जाऊन झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडाला मिठी मारली. त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांचे अनुकरण केले. गिरिधरदास व लाकूडतोड्याना लाकडे तोडू नका, अशी विनंती केली .परंतु गिरिधरदास यांनी त्यांच्या माणसांना आणि झाडांना वाचविण्यासाठी घट्ट धरलेल्या व उभ्या असलेल्या महिला यांच्यासह झाडे आणि महिलांची कत्तल करण्याची आज्ञा दिली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली व झाडांचे सुटका करण्यासाठी अनेक लोक धावले. पण झाडांची तोड सुरूच राहिली आणि रात्र होईपर्यंत ३६३ लोकांनी वनांचे संरक्षण करण्यासाठी आपला जीव गमावला होता. महाराज अभयसिंहांना जेव्हा ही बातमी कळली ,तेव्हा त्यांना पश्चाताप झाला .त्यांनी वृक्षतोड होणार नाही व कोणत्याही वन्यप्राण्यांना ठार केले जाणार नाही ,असा आदेश काढला .तेव्हाच चिपको आंदोलनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली व संरक्षणासाठी महिलांनी केलेला हा फार मोठा त्याग आहे, यातून महिलांची वनसंरक्षणासाठी ची भूमिका लक्षात येते.
            वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धैर्य व शौर्य दाखविणाऱ्या व्यक्तींना व गावाला किंवा समूहाला भारत सरकार तर्फे "अमृतादेवी वन्यजीवन संरक्षण पुरस्कार 'बहाल करण्यात येतो. 
           पर्यावरणाचा एकूण टोल थांबणारा निसर्गातला वनांचा हा अनमोल ठेवा जतन करणे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. जीवनातील स्पर्धा वाढल्यावर सहाजिकच स्वयंपाकासाठी इंधन ,गुरांसाठी चारा ,ऊर्जा अशा प्राथमिक समस्यांसाठी संघर्ष सुरु होतो व उपलब्ध वनांचा संहार सुरू होतो .याचा परिणाम हवामानावर, वातावरणातील वायूंच्या प्रमाणावर  होतो .पर्यावरणाचा असमतोल जाणवू लागला आहे. वृक्षारोपणाचे , वनसंवर्धनाचे व्यापक उद्दिष्ट
त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. वनांचे मानवी जीवनक्रमातील स्थान महत्त्वाचे व अनन्यसाधारण आहे. याचा प्रचार व प्रसार प्रत्येक सुजाण नागरिकाने आपापल्यापरीने जनसामान्यांना पेलवेल अशा पातळीवर जाणीवपूर्वक करणे अगत्याचे आहे. वनसंवर्धनासाठी संशोधन ,चर्चासत्रे ,कृतीसत्रे, व्याख्याने ,सेमिनार  आयोजित  केली पाहिजेत. शेती विकासात उपयुक्त वृक्ष शेती किंवा  शेतीला वाव मिळणे वनसंवर्धनासाठी अटळ गोष्टी आहे जंगल तोड थांबवण्यासाठी सरकारने कडक व खंबीर भूमिका घेणे आवश्यक आहे.
             पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतींनी मोफत रोपे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेऊन माळरान ,डोंगर ,पडीक जमिनी सारख्या सार्वजनिक जमिनींवर शेतकरी ,विद्यार्थी ,कामगार ,महिला ,सामाजिक व सहकारी संस्थांना सहभागी करून सामुदायिक वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम उत्तम रीतीने साधला पाहिजे . तरच पर्यावरणाचे संतुलन अतिशय चांगल्या प्रकारे होईल. जास्तीत जास्त उपभोग हेच जीवनाचे साध्य ठरेल ,तेव्हा मानवाचे अस्तित्व सुलभरीत्या या हरित वसुंधरेवर टिकेल . कारण मुळातच निसर्गाची योजना मानवाने जीवसृष्टी सह शांतता टिकवून राहावी अशी आहे. शाळा-कॉलेजमध्ये पर्यावरण हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यामुळे कागदोपत्री ज्या प्रमाणात दिसून येत आहे, त्या प्रमाणात कृतीत उतरवणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे हे विसरून चालणार नाही.
https://youtu.be/WlLq_F06A5w

Saturday, 27 February 2021

विज्ञान दिन

*२८ फेब्रुवारी*

*राष्ट्रीय विज्ञान दिवस*

भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या अनेक योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.  डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी.

लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो.मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप, प्रयत्न आणि कृत्ये प्रदर्शित करणे.सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते.देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे.लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी.


Sunday, 21 February 2021

DNA चा शोध

*२१ फेब्रुवारी १९५३*

*फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.*
डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल (: Deoxyribonucleic acid, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक अ‍ॅसिड ;) हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदू मध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल होय. या प्रकारच्या आम्लांना न्यूक्‍लिइक[मराठी शब्द सुचवा] आम्ल असे म्हणतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्लाच्या म्हणजेच डीएनए होय. डीएनए मध्ये जीवा बद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मानवी शरीर रचने मध्ये स्वरूप ठरव्यात हे महत्त्वाचे घटक असतात. जसे की मानवी रूप, रंग, बुद्धिमत्ता, कौशल्य, डोळ्याचा रंग, आकार, रूप, कातडीचा रंग हे सर्व घटक गुणसूत्रे ठरवतात. गुणसूत्रतंत्राधारे डीएनए चाचणीतून व्यक्ती ओळख करता येते करता येते. न्यायसहायक शास्त्रात (फोरेंसिक) याचा उपयोग होतो.प्रत्येक व्यक्तिच्या सेल न्युक्लिअस मध्ये डी एन ए आढळते. सन १८६९ मध्ये स्वीडिश फिजिशिअन फ्रायड्रीच माईसचर याने एका वापरलेल्या सर्जिकल बँडेजमधील पू व रक्त यामधून एक सुक्ष्म पदार्थ वेगळा केला. सेलच्या (पेशीच्या) न्युक्लिअसमध्ये त्याचे अस्तित्त्व असल्याने त्याला 'न्युक्लिईन' असे नाव दिले गेले. हेच न्यूक्लिईन पुढे डीएनए म्हणून ओळखले जाऊ लागले. डीएनए मध्ये कोडींग आणि नॉनकोडिंग असे क्रम असतात. नॉन कोडिंग डीएनए बेसेसचा क्रम प्रत्येक व्यक्तिंचा वेगळा असतो. व्यक्तिचे वेगळेपण या क्रमावर अवलंबून असते. त्यामुळे व्यक्तिची ओळख नॉन कोडिंग बेसेसच्या क्रमावरून होते. आई, वडील, मुलगा, मुलगी यांचे डीएनए ठसे समप्रमाणात आढळतात. सावत्र मुलाचे ठसे मात्र वेगळे असतात. आयडेन्टिकल जुळ्यांमध्ये डीएनए ठसे एकसारखेच असतात. डीएनए टेस्ट करताना व्यक्तीच्या रक्त, केस, वीर्य, इत्यादि नमुन्यातून डीएनए वेगळे केले जातात. त्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यानंतर पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शनच्या सहाय्याने घेतलेल्या डीएनए नमुन्यातील मात्रा वाढवण्यात येते. व त्याचे तुकडे केले जातात. या प्रक्रियेला फ्रॅगमेंटेशन असे म्हणतात. नंतर इलेक्ट्रोफोरेसीनने हे तुकडे वेगळे करून त्यांचे सदर्न ब्लॉटिंग पद्धतीने नायलॉन मेंब्रेनवर स्थलांतरण करण्यात येते. त्या ठशांमध्ये स्पष्टपणा यावा यासाठी रेडिओअ‍ॅक्टिव्ह रसायनाने लेबलिंग करण्यात येते. मेंब्रेनवर एक्स रे फिल्म ठेवण्यात येते. आणि मग रेडिओ अ‍ॅक्टिव्ह किरणांनी ती डेव्हलप केली जाते. मग हे ठसे पट्ट्याच्या रुपात दिसू लागतात. अशा प्रकारे डीएनए ठसे मिळवले जातात.आणि मग ते ठसे इतर ठशांबरोबर जुळतात की नाही ते पाहिले जाते व निष्कर्ष काढले जातात. एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत. सर्वसामान्यपणे शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डीएनए चाचणी केली जात असली तरी इतरही ठिकाणी ती चाचणी उपयुक्त ठरते.
उदाहरणार्थ --
 १) अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात. 
२) डीएनए चाचणीचा वापर करून बीबियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मश्रुमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो. 
३) डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तिचे, प्राण्याचे, वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते. 
४) डीएनए चाचणीमुळे व्यक्तीचे मातृत्त्व पितृत्त्व सिद्ध करता येते.

Tuesday, 2 February 2021

2फेब्रुवारी

*"जागतिक पाणथळ प्रदेश दिन- २ फेब्रुवारी"*

पाणथळ प्रदेश म्हणजे काय?
बहुउपयोगी पाणथळ प्रदेश.
पक्षी आणि पाणथळ प्रदेश.
आपण काय करू शकतो?

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील  'रामसर ‘ या शहरी ‘ पाणथळ प्रदेशाचे महत्त्व ‘ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी *२ फेब्रुवारी* हा दिवस *‘वेटलँड्स डे’* साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. 
असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.

*पाणथळ प्रदेश म्हणजे काय?*
नदी, तलाव, सागरी किनारे अशा ठिकाणी उथळ पाण्याने झाकलेल्या व अनेकविध प्रकारच्या गवतांनी आणि झुडपांनी भरलेल्या पाणथळ जमिनी आपल्याला आढळतात. 
यामध्ये कृत्रिम तलाव व कालवे, मिठागरे, सांडपाण्याचे तलाव, मत्सशेती तलाव, शेततळी, भाताची खाचरे अशा मानवनिर्मित स्थळांचाही समावेश होतो.

*बहुउपयोगी पाणथळ प्रदेश.*
सध्या आपण भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करतो. या पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम असे प्रदेश करतात. अनेकदा आपण प्रदूषित पाणी व इतर हानिकारक द्रव्ये अशा प्रदेशात फेकतो खरे; परंतु पाणथळ जागी वाढणा-या वनस्पतीच या घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्ध करतात. 
उदा. कोलकात्यातून बाहेर टाकल्या जाणा-या घाण पाण्याचा  काही भाग शुध्द करण्यासाठी जवळच्या पाणथळ प्रदेशाचा वापर केला जातो. 
भातखाचरे आणि मत्सबीज – उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशच असल्याने त्यांमधून जगभरातील ३ अब्ज लोकांना दररोजचे अन्न ( भात आणि मासे) मिळते. सागरी किनारपट्टीवर असलेल्या अशा गवतयुक्त पाणथळ प्रदेशांमुळे लाटांनी होणारी किना-यांची धूप थांबवली जाऊन वादळांपासून होणारे नुकसानही घटते. शिवाय समुद्राचे आक्रमण थोपवून किनारी जमीन अतिक्षारयुक्त (निरुपयोगी खारपड) होण्याची क्रियाही तेथील ‘मॅनग्रुव’ (खारफुटी) प्रकारच्या झुडपांमुळे कमी होते. नदीला पूर आल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यासही हे जास्तीचे पाणी किनारी पाणथळ प्रदेशात मुरते व मानवी वस्ती जलमय होण्याच्या संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी होते. 
महाराष्ट्राचा विचार केल्यास असे दिसते की इथले महत्त्वाचे पाणथळ प्रदेश हे दख्खनच्या पठारावरील नद्या- उपनद्या, धरणांमागील जलाशय आणि पाझर तलावांच्या आसपासच्या परिसंस्था आहेत. 
यामुळे भूजलाचे पुनर्भरण आणि पाझर यात मोलाची मदत होते.

*पक्षी आणि पाणथळ प्रदेश*
बगळे, बदके, करकोचे, खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्ष्यांना पाणथळ प्रदेशांतूनच अधिवास मिळतो. ‘प्लवर’ सारख्या विशिष्ट प्रजातींची घरटी पाणथळ प्रदेशांत आढळतात. करकोचे, शराटी (इबिस), चमचा, रोहित (फ्लेमिंगो) हे पक्षीही पाणथळ जागीच येतात. अगदी सायबेरियासारख्या प्रदेशांतूनही क्रेन आणि बदके इथे येतात. कारण इथे त्यांना अन्न मिळते. हे पक्षी या प्रदेशातील अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा दुवा असतात.

*आपण काय करू शकतो?*
दुर्दैवाने आज पाणथळ प्रदेशांकडे ‘वाया गेलेली जमीन’ म्हणूनच पाहिले जाते, पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन ते जतन करून, तिथला कचरा इ. दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे. 
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुध्दा पाणथळ प्रदेश वाचविण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते. 
आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटयाने पृथ्वीवरची ही महत्त्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची झीज राखली जाऊ शकते.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन.

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...