आपण पर्यावरण पूरक सण साजरे करु शकतो का?
"नेमेचि येतो पावसाळा
त्यातून निसर्ग सांभाळा"
असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण निसर्गाचा सारा आनंद आपणास खऱ्या अर्थाने श्रावणात पहायला भेटतो,अनुभवायला भेटतो.श्वासात भरलेला हा अनामिक सुगंध मनाला उल्हासीत करतो.पावसाची झडी, रिपरिप जाणवते.आषाढातील दमदार व मुसळधार पावसानंतर श्रावणात होणारा ऊन पावसाचा खेळ हे दृश्य नेहमीच विलोभनीय असते. कोमल उन्हात अंगावर होणारा पावसाचा शिडकावा एक वेगळीच अनुभूती देऊन जातो.शुभ्र उन्हात रिमझिमणाऱ्या पावसाचे चमकणारे मोत्यासारखे थेंब पाहणे, तसेच ते हातात पकडण्याचा प्रयत्न करणे हा आनंद श्रावणातच मिळू शकतो.
जेष्ठ महिन्यात येणारा वटपौर्णिमा हा महिलांचा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडित आहे.वडाचे झाड हे दीर्घकाळ टिकणारे असून त्याचा विपुल पर्णसंभार असतो. त्यामुळे वडाची झाडे हवा प्रदूषण नियंत्रणा बरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तम रीतीने करीत असते. तसेच त्याच्या घनदाट पानांमुळे ही झाडे हवेतील तापमान कमी करून शीतलता प्रदानकरते.वडाच्या झाडापासून 100 मीटरच्या आत प्रदूषणाचे प्रमाण हे अत्यंत अल्प असते किंवा प्रदूषणाचे प्रमाण नसतेच मुळी. तसेच बरेच पक्षी वडाच्या झाडाचा रात्रीच्या निवाऱ्या साठी उपयोग करतात. वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येतात. त्यामुळे पक्ष्यांना अन्न मिळते. आपल्या पूर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने वटपूजा करण्याची प्रथा रूढ केली आहे.वटपौर्णिमा हे व्रत हिंदू संस्कृतीत पती परमेश्वराच्या दीर्घआयुष्यासाठी करण्यात येणारे अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे . शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वडाजवळ येऊन बसल्याने फायदा होतो. आरोग्याला पोषक वातावरण लाभते.कारण निसर्गात वड,पिंपळ या वृक्षा मधून सर्वात मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन बाहेर पडतो म्हणून स्रीया जेंव्हा वडाच्या झाडाखाली बसून पुजा अर्चा करतात ,तेंव्हा त्यांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होतो . ते त्यांच्या आरोग्यास लाभदायक ठरते. महिलांना मुळातच नटून,थटून,सजून बाहेर पडायला आवडते आणि वटपौर्णमेच्या निमित्ताने नवी कोरी करकरीत साडी परिधान करून पुजा करणेआवडते. दागिने घालून पूजेसाठी स्रीया तयार होतात तेंव्हा त्यांच्या शरीरात सकारात्मक हॉर्मोन्स नैसर्गिकपणे तयार होतात . वडाच्या पानांमधून पावसाच्या सुरुवातीला द्रव निघतो त्यामुळें
स्त्रीयांना आजारा पासून संरक्षण मिळते . म्हणून वडाचे झाडाचे पूजन करून त्याची जतन केली पाहिजे कारण ते चोवीस तास
ऑक्सिजन देते. म्हणून निसर्गाची ही देणगी लाभावी यासाठी पूर्वजांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधले आहे.
श्रावण व भाद्रपदात भरपूर पवित्र दिवस येतात .या दिवसांना बेल ,तुळस, दुर्वा इ.पत्री देवास वाहिली जाते. यानिमित्ताने लोकांनी निसर्गाशी जवळीक साधावी हाच यामागे प्रमुख उद्देश आहे .पत्री मध्ये आघाडा ,जास्वंद , शमी, कन्हेर, मोगरा ,जाई-जुई ,बेल ,तुळस यासारख्या बऱ्याच वनस्पतींची पाने गोळा केली जातात. पत्री गोळा करण्याच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वनस्पतींची ओळख होत असते. या प्रत्येक वनस्पतीत काही ना काही औषधी गुणधर्म आहेत त्यांची माहिती लोकांना ज्ञात होते .तसेच या पत्री जास्तीत जास्त लोकांना ऊपलब्ध होतील याचीही काळजी घेतली जावू शकते .या वनस्पतींना पत्री म्हणतात असेही काहींना माहिती नाही.आता पत्री गोळा करणे हा प्रकार नामशेष होत चालला आहे. फार फार तर बाजारातून दूर्वा बेल व पत्री चा पुडा विकत आणून पूजाअर्चा पार पाडली जाते .तेव्हा ही जुनी परंपरा लहान प्रमाणात पुनर्जीवित करू शकतात . घराजवळ किंवा शाळेतील मोकळ्या जागी परस बागेत किंवा गच्चीवर या औषधी वनस्पतींची पत्री वाटिका तयार करता येईल. आपले पूर्वज फार हुशार होते. निसर्गातील या विविध पानांची ओळख आपल्याला व्हावी, यासाठी वेगवेगळ्या व्रतवैकल्य , सण, उत्सव यांच्याशी झाडे व पाने, फुले , फळे यांची सांगड घातली गेली आहे .हरतालिकेच्या वेळी वाहण्यात येणारी पत्री ही सुद्धा झाडावरून तोडली जाणे, म्हणजेच त्या झाडांमधील वाढीस कारणीभूत ठरणारी हार्मोन्स ची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. यासाठी काही झाडांवरील पाने तोडली गेली तर झाडाच्या उंचीत व पानांच्या संख्येत निश्चितच वाढ होते, हे वनस्पतिशास्त्र सांगते. म्हणून आपण सहज म्हणू शकतो की हरितालिका व्रत सुद्धा निसर्गाचे रक्षणच करते.
आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गणेश उत्सव हा उत्सव महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी भल्या मोठ्या मूर्ती स्थापन करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागलेली असते. यात प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडूच्या मूर्ती किंवा पेपर कागदाचा लगदा पासुन लहान गणपती तयार करू शकतो. तसेच मूर्तीसाठी रासायनिक रंग ऐवजी नैसर्गिक रंग वापरू शकतो आणि मूर्तीचे विसर्जन घरीच हौदातील पाण्यात किंवा टाक्यांमध्ये घरगुती स्वरूपात विसर्जन करु शकतो. यातून आपण मोठ्या प्रमाणावर प्रदूषणास आळा घालू शकतो व निसर्ग संवर्धन करून जनजागृती करू शकतो. गणेशोत्सवात गणपतीला दुर्वा वाहिली जाते तसेच जास्वंदाचे फुल म्हणजेच गणेश फूल वाहिले जाते .दुर्वा व जास्वंदाच्या फुला शिवाय गणपतीची पूजा-अर्चा होऊ शकत नाही ,अशी भावना आहे.याद्वारे जास्वंदीच्या झाडांची लागवड करणे ,संगोपन करणे व संवर्धन करणे म्हणजेच निसर्गाचे रक्षण करणे . तसेच पावसाळ्यात दुर्वा म्हणजेच भूमिगत खोड असून पावसाळ्यात दुर्वांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. गणपती बाप्पाचे पुजन करण्याच्या निमित्ताने दुर्वांची जुडी तयार करण्यात येते. म्हणून मोठ्या संख्येने दुर्वा तोडून घेतल्यात तर पुन्हा नव्याने वाढ होते म्हणजेच निसर्गाचे संवर्धन करणे यातून अधोरेखित होते.
आपल्या भारतीय संस्कृती सण आणि उत्सवांची नुसती लयलूट आहे मानव प्राणी हा मुळातच उत्सवप्रिय प्राणी आहे आपल्या पूर्वजांनी विज्ञानाची सांगड धर्माशी व संस्कृतीशी घातली आहे व परराष्ट्र सणात कुठल्या ना कुठल्या वृक्षाचे महात्म्य साधले आहे यानिमित्ताने त्या वृक्षाचे औषधी गुणधर्म आपण लक्षात घ्यावे तसेच धर्माचे पालन करता करता आपल्या आरोग्यास हितकारक सवयीही अंगीकारला जाव्यात .हाच यामागील उद्देश असावा. पण आज काल या सणांच्या मूळ उद्देशांकडे दुर्लक्ष होऊन अनिष्ट गोष्टींना प्रोत्साहन दिलं जात आहे .त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या प्रदूषणात भर घालत आहोत. म्हणून सर्व सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करता येऊ शकतात का? याचा विचार आपण केला पाहिजे व त्या दृष्टीने आपली कृती असणे आवश्यक आहे.
श्रीमती मेघा अनिल पाटील
उपशिक्षिका
श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर जिल्हा नंदूरबार.
मोबाईल नंबर 9665189977
Email patilmeghaa@gmail.com



























































