बायो-सीएनजी. . .... बायोगॅस
बायोगॅस हा अनेक वायूंचे मिश्रण आहे व त्यामधील मिथेन हा प्रमुख ज्वालाग्राही वायू असतो. नेहमीच्या वापरातील कोणतेही डिझेल इंजिन काही थोडे बाह्य़ तांत्रिक बदल (रेट्रो-फिटिंग) करून बायोगॅस व डिझेलच्या मिश्रणावर चालवता येते. या पद्धतीला ‘डय़ुएल फ्युएल’ इंजिन पद्धती म्हणतात. या पद्धतीने ६५-७० टक्के डिझेलची बचत साधता येते. अशा ‘डय़ुएल फ्युएल’ इंजिनचा वापर मुख्यत: विद्युतनिर्मितीसाठी केला जातो. निसर्गत: उपलब्ध होणाऱ्या सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) चासुद्धा प्रमुख घटक मिथेन असतो. आज आपल्या देशात तसेच जगभर सीएनजीचा उपयोग विद्युतनिर्मितीसाठी आणि वाहनइंधन म्हणूनही केला जातो. यासाठीचे तंत्रज्ञान आता पूर्णत: विकसित झालेले आहे. भारतातील अनेक शहरे वाहनांमध्ये सीएनजी वापरात आणण्यामुळे प्रदूषणमुक्त होण्याचा मार्गावर आहेत.
बायोगॅसमधील मिथेन शुद्ध स्वरूपात मिळवल्यास सीएनजीऐवजी तितक्याच कार्यक्षमतेने वापरता येतो. यासाठी सुरुवातीला बायोगॅसमधील मिथेन वायूचे विलगीकरण विविध प्रक्रियांच्या माध्यमातून केले जाते. या प्रक्रियांतून ९५ टक्क्यांपर्यंत शुद्ध स्वरूपात मिथेन वायू मिळवला जातो. ते पुढे २५० ते ३०० बार प्रेशरला (१ बार = १ किलोग्रॅम बल/ सेंटिमीटर वर्ग) विशिष्ट प्रकारच्या सिलेंडर (कम्पोझिट सिलेंडर)मध्ये भरला जातो. या प्रकारे मिळवलेल्या इंधनाला आज ‘बायो-सीएनजी’ किंवा ‘बायो-मिथेन’ म्हणून ओळखले जाते. हे सिलेंडर पुढे विद्युतनिर्मिती करणाऱ्या जनरेटरला किंवा कोणत्याही वाहनाला इंधन पुरवठा करण्यासाठी जोडता येतात. मिथेनच्या शुद्धीकरण प्रक्रियेतून मोठय़ा प्रमाणावर सल्फर हे उप-उत्पादन प्राप्त होते.
आज भारतात विविध प्रकारच्या जैव-विघटनशील पदार्थापासून- म्हणजे मुख्यत: शेण, तेल बियांची पेंड, साखर कारखान्यातील प्रेसमड (घट्ट मळी), फळे-भाजी बाजारामधील निरुपयोगी कचरा आणि शिळे व टाकाऊ अन्नपदार्थ यांच्यापासून- मोठय़ा प्रमाणावर बायो-सीएनजी निर्माण केला जातो. महाराष्ट्रात पुणे येथे बांबू व नारळ शहाळ्याच्या टरफलापासून बायो-सीएनजीची निर्मिती व त्याचा वाहनइंधन म्हणून उपयोग २०१६ साली यशस्वीरीत्या करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या बायोगॅसवर चालणारी बस कोलकाता येथे एप्रिल २०१७ मध्ये कार्यरत झाली आहे. बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करून वीजनिर्मिती करू शकणारी भारतीय कंपन्यांची जनित्रे (जनरेटर्स) आता उपलब्ध झाली आहेत.
No comments:
Post a Comment