Tuesday, 24 November 2020

झाड किती उंच वाढू शकते ?

🌲 *झाडं किती उंच वाढू शकतात?* 🌲
************************************

कसं सांगता येईल ते? कारण वेगवेगळ्या झाडांची उंची वेगवेगळी असते. काही झाडं बुटकी असतात. त्यांना कितीही खतपाणी दिलं तरी त्यांची उंची त्यापेक्षा जास्त वाढतच नाही. उलट ताडामाडासारखी काही झाई लंबूटांग असतात. सरळसोट वाढतच जातात. तरीही त्यांची तरी उंची किती होईल? म्हणजे त्यांच्यासारखं उंच वाढणारं झाड घेतलं तरी त्याची उंची जास्तीत जास्त किती होईल? की जोवर त्याला पुरेसं पाणी, पोषणद्रव्यं, सात मिळत राहील तोवर त्याच्या उंचीला काही मर्यादा पडणारच नाहीत?

याचंच उत्तर शोधण्यासाठी अरिझोना विद्यापीठातल्या प्राध्यापक कॉख यांनी अतिशय अनोखा प्रयोग केता. कॅलिफोर्नियामध्ये वाढणारी रेडवूड जातीची झाड ही जगात सर्वात जास्त उंचीची आहेत. तिथल्या पर्जन्यवनात वाढणाऱ्या या झाडांची उंची सध्याच ११० मीटरहून अधिक आहे. ती आणखी किती वाढेल, याची माहिती मिळवण्यासाठी कॉख यांनी सरळ तीच उंची गाठली. दोर, तारांचा झुला वगैरे यंत्रणेच्या मदतीनं त्यांनी सरळ त्या शेंड्यावरच मजल मारली. तिथं पोहोचल्यावर तिथल्या पानांमध्ये कोणत्या घडामोडी चालू आहेत त्याचं निरीक्षण केलं.

पानं प्रकाशसंश्लेषणाचं काम करतात. मुळापासून मिळालेलं पाणी आणि हवेतून शोषून घेतलेला कार्बन डाय ऑक्साईड वायू यांना सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं ती एकच गुंफून टाकतात आणि त्यापासून कर्बोदकं तयार करतात. कॉख यांना तिथंचालणारं प्रकाशसंश्लेषण अतिशय मंद गतीनं आणि किमान कार्यक्षमतेने चालू असल्याचे दिसलं. पानांचा आकारही खुरटा झाला होता. वास्तविक त्या उंचीवर असणार्या ढगांमध्ये भरपूर बाष्प होतं; पण तेही शोषून घेणं त्या पानांना शक्य होत नव्हतं. मुळांपासून मिळणाऱ्या पाण्याचा ओघही आटता होता.

मुळांपासून झाई पाणी वरवर चढवत जातात तो गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत. त्यांच्या अंगी असलेल्या अतिशय पातळ अशा झायलेम नावाच्या जलवाहिन्या हे काम करतात. त्या अतिशय पातळ असल्यामुळे पंपासारखं फार उंचीवर पाणी ओढून नेऊ शकतात. शिवाय या झायलेममध्ये मधूनमधून झडपा असतात, त्यामुळे पाणी उलट्या दिशेनं फिरू शकत नाही.

सामान्यतः पंपांना जोडलेल्या नलिकांमध्ये पाणी ओढण्यासाठी जोर लावला तर पाण्याचा स्तंभ मोडून त्यात हवेचे बुडबुडे तयार होतात, त्यामुळे पाणी आणखी वर ओडल जाऊ शकत नाही; पण झायलेमच्या नलिकांचा परीघ अतिशय कमी असल्यामुळे त्या जास्त उंचीवर पाणी ओडून नेऊ शकतात. तरीही त्या नलिकांच्या भिंतीशी होणाऱ्या घर्षणामुळे आणि गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करण्यासाठी खर्ची पडणाऱ्या ऊर्जेमुळं जसजसं अधिक उंचीवर जावं तसतशी या नलिकांची कार्यक्षमता घटतच जाते.

त्यापायीच रेडवूडच्या त्या ११० मीटरपेक्षा अधिक उंचीवरच्या पानांना पाण्याची कमतरता जाणवत होती. जणू ती पर्जन्यवनात नसून एखाद्या वाळवंटातच होती. त्यामुळे त्यांच्या एकंदरीत कार्यक्षमतेत कमालीची घट झाली होती. ती ध्यानात घेऊन कॉख यांनी त्या खरं तर कोणत्याच झाडांची उंची १३० मीटरपेक्षा जास्त म्हणजे साधारण ३५ मजली इमारतीपेक्षा जास्त उंच असणार नाही, असा निष्कर्ष काढला आहे.

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन*    
               साभार.

No comments:

Post a Comment

Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...