Thursday, 6 February 2020

व्यसन

📙 *व्यसनाधीनता* 📙
**********************

 व्यसन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटणे. व्यवहारात व्यसन हा शब्द एखाद्या वाईट सवयीबद्दल, तिच्या आहारी जाण्याबद्दल वापरला जातो. तंबाखू खाणे, सिगारेट वा विडी ओढणे, तपकीर ओढणे, दारू पिणे, सुपारी खाणे, अफू, हेरॉईन, गांजा यांचे सेवन करणे - या बाबतीत जेव्हा स्वतःच्या इच्छेनुसार एखादा माणूस ही गोष्ट थांबवू शकत नाही, तेव्हा तो या बाबतीत व्यसनाधीन झाला आहे, असे समजतात. सवय व व्यसन या बाबतीतील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे, हेही तितकेच खरे.

 सुपारीच घ्या ना. जेवणानंतर सुपारी खावीशी वाटते, हा सवयीचा भाग. पण सुपारी मिळाली नाही तर अस्वस्थपणा येणे, चैन न पडणे, व्यवहार न सुचणे हा व्यसनाचा भाग. काही पदार्थांच्या बाबतीत ही फक्त सवय असते. ती निग्रहाने सुटणे शक्यही होते. पण बर्‍याच बाबतीत व्यसनाधीनता म्हणजे त्या माणसाच्या शरीरातील, रक्तातील विशिष्ट द्रव्याचे प्रमाण कमी झाले म्हणून शरीर आतून मागणी करू लागते. म्हणजे सिगारेट ओढणारा व तंबाखू खाणारा यांच्या बाबतीत रक्तातील निकोटीनचे प्रमाण कमी होऊ लागले की, तलफ येऊ लागते. ते प्रमाण योग्य पातळीवर पोहोचले की समाधान होते. या बाबतीत दारू वा अल्कोहोलची तीच गोष्ट आहे. रक्तातील ठराविक प्रमाण जसे कमी होईल, तशी मेंदूकडे संवेदना पाठवली जाऊन व्यसनी माणूस पुन्हा दारूची मागणी करू लागतो. नाही मिळाली, तर प्रथम अस्वस्थ होतो. नंतर चिडचिडा बनतो, नंतर रागावतो, घामाने डबडबू लागतो, थरकाप होऊ लागतो. ही सगळी व्यसनाधिनतेचीच लक्षणे आहेत.

 पण सिगारेट, दारू, तंबाखू, तपकीर यांचे 'व्यसन' लागायला अनेक दिवस त्यांचे सेवन करणे जरुरीचे असते. एखाद्या आठवड्याभरात या गोष्टींची सवय लागली व व्यसन जडले, असे सहसा घडत नाही, याउलट गांजा, हेरॉईन, अफू, कोकेन इत्यादी मादक पदार्थांबाबतीत मात्र जेमतेम पाच ते सहा वेळा या द्रव्यांच्या संपर्कात आल्यानंतर लगेच माणूस या द्रव्यांच्या आहारी जातो. या अमली पदार्थांना हातही न लावणे याचं कारणाकरता अत्यंत आवश्यक असते. 'एकदाच चरस वा गांजाची चिलीम ओढून बघू, मला व्यसन लागणे शक्यच नाही' असा प्रकार सहसा घडत नाही. पहिल्या चिलमीचा हा परिणाम संपतानाच शरीर दुसर्याची मागणी करू लागते. ही मागणी धुडकावणे जवळपास शक्य होत नाही. काय चालले आहे, ते कळायच्या आत माणूस त्या व्यसनाचा कच्छपी लागलेला असतो.

 नदीच्या शांत पात्रात एखादा भोवरा असतो. पोहणारा त्या भोवर्‍याकडे कुतूहलाने बघता बघता आत ओढला जातो. गरागरा फिरताना पाण्याच्या तळाशी कधी गिळला जातो, ते कोणालाच कळत नाही. ज्यांना अलीकडे 'ड्रग्ज' किंवा अंमली पदार्थ म्हणतात, त्यांच्या सेवनानंतर अशीच स्थिती होते.

 यावर उपाय आहेत. ते म्हणजे दोनच. अंमली पदार्थांना अजिबात हात न लावणे, दूर राहणे हा पहिला. दुसरा म्हणजे चुकून व्यसनाधीन झाल्यास तज्ज्ञ उपचारांकरवी त्यातून मुक्तता मिळविण्याचा. पहिला उपाय शंभर टक्के यशस्वी, तर दुसऱ्यामध्ये जेमतेम पन्नास टक्केच यश मिळते.

 कोणता मार्ग चांगला, ते तुम्हीच सांगा ना ! 

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून

Monday, 16 December 2019

circulatory system

📙 *रक्ताभिसरण संस्था* 📙
***************************

 एकपेशीय अमिबापासून बहुपेशीय प्राण्यांकडे वाटचाल होताना एका महत्त्वाच्या अडचणीकडे निसर्गाचे लक्ष्य गेले असावे. ती अडचण म्हणजे असंख्य पेशींनी बनलेल्या प्राण्यांच्या सर्व पेशींचे पोषण कसे करायचे ? यावरचा तोडगा म्हणून निसर्गाने रक्ताची निर्मिती केली असावी. अर्थातच या रक्ताला संपूर्ण शरीरात थेटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रक्ताभिसरण संस्थेकडे सोपवली गेली. रक्ताचे शुद्धीकरण उत्सर्जनसंस्था करते, तर रक्तातील लाल पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा श्वसनसंस्था करते. रक्तातील लाल, पांढऱ्या व प्लेटलेट पेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. हृदय हा आजीवन चालू राहणारा पंप विशिष्ट स्नायूंनी बनलेला असतो. स्वनिर्मित विद्युतसंवेदनाद्वारे हृदयाचे काम चालू असते. पण ही संवेदननिर्मिती का थांबते व कशी सुरू होते, हे अजूनही गूढच आहे. हृदय या पंपाची क्षमता चौपटीनेसुद्धा गरजेनुसार वाढू शकते.

 मानवी हृदयाला चार कप्पे असतात. वरचे कप्पे कर्णिका, तर खालचे जवनिका या नावाने ओळखले जातात. हृदयाच्या डाव्या जवनिकेतून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, तर उजवा जवनिकेतून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त पाठवले जाते. तेथून आलेले प्राणवायुमिश्रीत शुद्ध रक्त डाव्या कर्णिकेत येते. याउलट शरीराकडून परत आलेले अशुद्ध रक्त उजव्या कर्णिकेत येते. प्रथम कर्णिका व नंतर जवनिका यांचे आकुंचन व प्रसरण चालू राहून रक्ताभिसरण कायम राखले जाते. महारोहिणीच्या असंख्य शाखा फुटून त्यांचे रूपांतर केशवाहिन्यांत होते व त्यानंतर नीलांची सुरुवात होते. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळचा दाब व प्रसारणाच्या वेळचा दाब हा रक्तदाब म्हणून मोजला जातो.

 सर्वच प्राण्यांमध्ये रक्त व रक्ताभिसरणसंस्था कार्यरत असते. मात्र रक्तपुरवठ्याच्या गरजा प्राण्याच्या आकारमानाप्रमाणे बदलतात. जिराफाच्या आकारापेक्षा त्याची मान खूपच उंच असते. त्याच्या मेंदूला लागणारा प्रचंड रक्ताचा पुरवठा करण्यासाठी त्याच्या हृदयाचा आकार व रक्तदाब दोन्ही जास्त असतात. याउलट सरपटणाऱ्या सर्वच प्राण्यांचे आकार छोटे असोत वा अजस्र, पण हृदयाचा आकार लहानच असतो. कासवाच्या हृदयाला तीन कप्पे असतात. मगरीच्या हृदयाला तीन कप्पे असले, तरी डावी जवनिका एका पडद्याने विभागलेली असते. गायीगुरांमध्ये माणसाप्रमाणेच हृदयाला चार कप्पे आढळतात.

 सरपटणारे प्राणी व पाठीचा कणा असलेले सस्तन प्राणी यांच्या रक्ताभिसरणक्रियेत एक महत्त्वाचा घटक बदल घडवतो. सस्तन प्राण्यांच्या खांद्यातून त्यांना मिळणाऱ्या ऊर्जेचे स्वरूप शर्कराज्वलनातून मिळणाऱ्या कॅलरीज असे असते. त्यामुळे त्वचेचे तापमान योग्य राखून विविध हवामानाला तोंड देणे याला रक्ताभिसरणसंस्थेची मदत मिळते. शून्याखालील तापमानापासून पन्नास डिग्री सेंटीग्रेड इतक्या उष्ण तापमानाला तोंड देणे यामुळेच शक्य होते. त्वचेखालील रक्तवाहिन्यांचे प्रचंड मोठे जाळे व त्वचेची त्याला मदत होते. त्वचेबाहेर टाकला जाणारा घाम शरीराचे तापमान कमी करतो, तर थंडीत रक्तवाहिन्यांचे आकुंचन शरीराची उष्णता कायम राखते. याउलट सरपटणारे प्राणी तापमानातील बदल व सततचा तीव्र सूर्यप्रकाश सहन करू शकत नाहीत. उष्ण रक्ताचे, असे जरी सस्तन प्राण्यांचे वर्णन असले व सरपटणाऱ्या थंड रक्ताचे आपण समजत असलो, तरी बाह्य तापमानाइतकेच त्यांचे रक्ताचे तापमान राखले जाते. रक्ताभिसरण संस्थेचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे काही कारणाने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊन रक्तस्राव सुरू झाला, तरी तेथे रक्त गोठविण्याची प्रक्रिया सुरू करून रक्तस्राव थांबवणे. रक्ताभिसरणसंस्था तात्काळ या कमतरतेवर मात करण्यासाठी कामाला लागते व जेमतेम आठवड्याभरात ही तूट भरून काढली जाते. मात्र रक्तस्रावामुळे वीस टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लिटरपेक्षा जास्त तूट निर्माण झाली व ती काही वेळात भरून काढली गेली नाही तर प्रमुख इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर कायमचे दुष्परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होतो.

Wednesday, 11 December 2019

Liver

📙 *यकृत* 📙 
***************

आपल्या शरीरातील फार मोठी रसायनशाळा असे यकृताबद्दल सहज म्हणता येते. यकृताच्या कामात अगदी किरकोळ अडथळा आला किंवा विकृती निर्माण झाली, तर साऱ्याच शरीरातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम होतो. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. श्वासपटलाच्या खाली उजव्या बाजूला बरगडीच्या आत यकृत सुरक्षित असते. यकृतदाह झाल्यास यकृताचा आकार वाढतो. तो पोटावरुन हाताला खालची कड लागून समजू शकतो.

 यकृतात मुख्यतः पित्ताची निर्मिती होत असते. ते पित्ताशयात साठवले जाते. अन्नपचनक्रियेत गरजेनुसार ते पाझरून आतड्यातील अन्नपदार्थात मिसळते. आहारातील स्निग्ध पदार्थांवर त्याची प्रक्रिया होऊन त्याचे दुधासारखे मिश्रण तयार होते. स्निग्ध पदार्थांच्या शोषणालाही पित्त हातभार लावते. अन्नमार्गातून शर्करा शोषून घेतल्यावर शिलकीतील साठा ग्लायकोजेन या रूपाने यकृतात साठवला जातो. जेव्हा शरीराला गरज असेल, तेव्हा ग्लायकोजेनचे पटकन ग्लुकोजमध्ये रूपांतर केले जाते.

 याशिवाय यकृतामध्ये शरीरातील लाल पेशी तयार करणे व नष्ट करणे हाही उद्योग सतत चालू असतो. रक्त गोठवण्यासाठी आवश्यक फायब्रिनोजेन द्रव्याची निर्मिती यकृतातच होते. जीवनसत्त्वांचा साठा येथेच केला जातो. रक्तातील विषारी द्रव्ये नष्ट करणे, प्रथिनांच्या चयापचयानंतर युरिया व युरिक आम्लाची निर्मिती व स्निग्ध पदार्थांचा शरीरव्यापारासाठी उपयोग ही कामे येथेच घडतात.

 एखाद्या माणसाचे यकृत काम करेनासे झाले, आक्रसले, तर त्याला लिव्हर सिरॉसिसचा आजार आहेत झाला आहे, असे म्हणतात. हळूहळू पण निश्चितपणे मृत्यूकडे वाटचाल करणारा हा आजार ठरतो. याची लक्षणे म्हणजे उदरपोकळीत पाणी भरणे, त्याला जलोदर असे नाव आहे. यकृतारोपणाची शस्त्रक्रिया हा एकमेव इलाज यावर गेल्या दशकात उपलब्ध आहे. पण तो सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा व भारतातही अगदी मोजक्या रुग्णालयांत उपलब्ध आहे.

 रक्ताच्या विविध चाचण्यांतून, अल्ट्रासोनोग्राफीतून किंवा आवश्यक असेल तर यकृताचा छोटा तुकडा बाहेर बारीक सुईवाटे तपासायला काढून (लिव्हर बायोप्सी) यकृताच्या कार्याबद्दल आपण जाणून घेऊ शकतो. अतिमद्यपान, वरचेवर झालेली कावीळ, पित्ताशयात खडे साचून त्याचा झालेला परिणाम यांमुळे यकृतात गंभीर विकृती निर्माण होतात. या विकृतींचा इलाज आजही आधुनिक वैद्यकाला सापडलेला नाही, तर आयुर्वेददीय इलाजांचे प्रमाणीकरण झालेले नाही.

Monday, 9 December 2019

मृत्यु

*मृत्यूची परिभाषा ?*

 प्रत्येक सजीवाच्या आयुष्याची मर्यादा निसर्गाने घालून दिलेली आहे. जो जन्मला, त्याचा मृत्यू अटळ आहेच. पण मृत्यू म्हणजे नेमके काय, यावर मात्र कित्येक वर्षे एकमत होतच नव्हते, असे सांगितले, तर विश्वास बसेल काय ? कोणी म्हणेल, 'शहाण्यासुरत्या अडाणी माणसालासुद्धा कोणी जिवंत आहे किंवा मृत हे सहज कळते आणि मृत्यूची व्याख्या करणे जमत नव्हते म्हणजे काय ?' पण परिस्थिती तशीच होती. याचे कारणही उघड होते. गेल्या तीस एक वर्षात घडत गेलेल्या प्रगतीमुळे यांत्रिकरित्या एखाद्या प्राण्याचे हृदय वा श्वासोच्छ्वास सतत चालू ठेवणे शक्य झाले आहे. यामुळे जी गोष्ट कोणाही सुजाण माणसाला सहज उमजत होती, ती भल्याभल्यांना ठरवणे कठीण होऊन बसले.

 एखाद्या अपघातात मेंदूला जबर इजा झालेली, पण बाकी संपूर्ण धडधाकट माणूस रुग्णालयात आल्यावर त्याच्या हृदयाची क्रिया म्हणजे स्पंदन व श्वसन चालू ठेवता येते; पण त्याचा मेंदू मात्र काहीच काम करत नसतो. येथेच सर्व वाद सुरू झाले. हा असा माणूस मृत समजावा का जिवंत ? त्याची हृदयक्रिया व कृत्रिम श्वसन चालू ठेवणारी यंत्रे चालू ठेवायची, का बंद करायची ? त्याचे विविध अवयव म्हणजे हृदय, यकृत, मूत्रपिंड, रक्त यांचा उपयोग दुसऱ्या रुग्णासाठी करून घ्यायचा की त्यांना तसेच राहू देऊन 'मरू' द्यायचे ?

 निरनिराळ्या अवयवांचे आरोपण सुरू झाले व हे प्रश्न तीव्रतेने समोर येऊ लागले. तसेच कृत्रिम पद्धतीने जगवण्याचा खर्चही पेलेनासा झाला व या प्रश्नांना वाचा फुटली. बेशुद्धावस्थेतील किंवा जवळपास 'मेल्यातच जमा' असलेल्या रुग्णांबद्दल, अगदी जवळच्या नातेवाईकांनाही त्याची अवस्था बघवत नसल्याने काय निर्णय घ्यावा हे कळेनासे झाले.

 या बाबतीत काही जागतिक परिषदा, धार्मिक चर्चा, तात्त्विक मते यावर खूप चर्वितचर्वण होऊन आता जवळपास जगातील निदान वैद्यक तज्ज्ञांचे एकमत झाले आहे. या मतावर काही प्रगत देशातील कोर्टांनी निर्णय देऊन त्याला संमतीही दिली आहे. हे एकमत असे - 

*ज्या रुग्णाच्या मेंदूतील गाभ्याचा भाग (Brain Stem) काम करेनासा झाला आहे, आपली श्वसनक्रिया रुग्ण स्वतःहून करू शकत नाही, अशा रुग्णाचे हृदय चालू असो वा नसो, त्याला मृतच समजण्यात यावे.

 या निर्णयामुळे एक मोठा फायदा झाला. अत्यंत आजारी असलेल्या, हृदयविकाराच्या व मूत्रपिंड काम करत नसलेल्या अनेक मरणासन्न व्यक्तींना जीवनदान मिळाले आहे. रस्त्यातील अपघातात अनेक जण 'मृत' होतात. त्यांचे अवयव आता रोपणासाठी वापरता येतात. एवढेच नव्हे, तर काही देशांत यासाठी तातडीची यंत्रणाही उभारली गेली आहे. गरजू रुग्ण, त्याचा रक्तगट, त्याची गरज ही एका केंद्रीय संगणकात ठेवली जाते. देशातील प्रत्येक अवयवाच्या उपलब्धतेची नोंद त्याच्याशी पडताळून तातडीने हे अवयव तिथे पाठवायची व्यवस्था होऊ शकते.

 पूर्वापारची मृत्यूची व्याख्या कोणती ? मेंदू, हृदय, श्वसन या तिन्ही गोष्टी ज्या रुग्णात काम करत नाहीत, त्याला मृत समजतात. बहुधा प्रथम हृदयक्रिया बंद पडते, त्या पाठोपाठ श्वसन थांबते, अर्थातच मेंदूला होणारा शुद्ध रक्तपुरवठा बंद पडल्यावर मेंदूचे कामकाज जेमतेम चार मिनिटांतच थांबते.

 एखादा प्राणी वा इसम जिवंत आहे वा मृत हे समजणे अगदी सोपे आहे, असे वाटत असले, तरीही मृत्यूनंतरच्या काही मिनिटांत हीच गोष्ट सांगणे मात्र कठीण असते. बंद पडलेले हृदय कदाचित सुरू होण्याची शक्यता असते. श्वसन त्यानंतर सुरू होऊ शकते. त्यामुळेच काही वेळा फसगत झाल्याच्या गोष्टी ऐकायलाही मिळतात. या बाबतीतील निष्कर्षांप्रत येण्याचे एक खात्रीलायक निरीक्षण म्हणजे डोळ्याची बाहुली. मृत व्यक्तीच्या बाहुल्यांची प्रकाशाला साद देण्याची शक्ती सर्वात प्रथम जाते. हा प्रकार जेमतेम काही मिनिटांत होतो. डोळ्यांतील बाहुली (pupils) पूर्ण विस्तारित झाली असेल, प्रकाशाला प्रतिसाद देत नसेल, तर मृत्यूने नक्कीच घाला घातला आहे, असे समजावे.

Saturday, 30 November 2019

जागतिक एड्स जनजागृती दिन

*आता एड्सला इतिहासजमा करायचं...!*


आजच्या जागतिक एड्सदिनाच्या निमित्तानं, बदलत्या परिस्थितीत एड्स निर्मूलनापुढील नव्या आव्हानांचा आढावा घेणारा लेख-

आज जागतिक एड्स दिनी एक वास्तव मान्य करायला हवं. ते म्हणजे आजही एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यापासून पूर्णपणं सुटका होणं शक्य नाही! एचआयव्हीच्या संसर्गाचं आणि नंतर पूर्ण विकसित एड्स होण्याचं केंद्र अमेरिका-युरोपमधून आफ्रिâका-आशिया खंडात स्थिरावलं, ते १९९०च्या दशकामध्ये. त्यावेळी या विषाणूचा संसर्ग होऊ न देणं हाच त्यावर विजय मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं सांगितलं जात होतं. याचं कारण या विषाणूचा संसर्ग झाल्याचं तपासणीत सिद्ध झालं तर त्याचा त्यावेळी सरळ अर्थ असा होत असे की संबंधिताचे दिवस भरत आले आहेत! आज अत्यंत परिणामकारक अशी अँटीरिट्रोव्हायरल (हा विषाणू अँटीरिट्रोव्हायरल गटातला आहे. याच्या केंद्रकामध्ये डीएनएच्या ऐवजी आरएनए असतो. मात्र माणसाच्या शरीरात घुसल्यानंतर हा विषाणू एका रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या आरएनएचं रूपांतर डीएनएमध्ये करतो!) औषधं उपलब्ध आहेतच, पण ती १९९०च्या दशकामध्ये मिळत होती, त्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहेत.

या औषधांमुळं संबंधिताच्या शरीरातील या विषाणूचं प्रमाण इतकं कमी होतं की ही औषधं नियमितपणं घेणाऱ्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची संभाव्यता खूपच कमी होते! मात्र तरीसुद्धा या विषाणूचा धोका कायम आहे! जोपर्यंत या विषाणूच्या सर्व उपप्रकारांवर परिणामकारक ठरेल अशी लस विकसित होत नाही, तोपर्यंत हा धोका कायम राहणार आहे. एखाद्या कसलेल्या बहुरूप्यालासुद्धा लाजवेल अशा गतीनं स्वतःमध्ये झटपट बदल घडवून आणण्याची विलक्षण क्षमता या विषाणूमध्ये आहे आणि परिणामकारक लस विकसित करण्यामधली तीच एक मोठी धोंड आहे. मात्र आता परिणामकारक अँटीरिट्रोव्हायरल औषंधामुळं हा विषाणू पूर्णपणं नेस्तनाबूत होत नसला, तरी संबंधिताच्या शरीरातील त्याचं प्रमाण (शास्त्रीय परिभाषेत व्हायरल लोड. विषाणूचं ओझं!) लक्षणीय प्रमाणात कमी होतं. आणि ती व्यक्ती प्रदीर्घ काळ या विषाणूसह आपलं सर्वसाधारण आयुष्य जगू शकते.

गेल्या ३० वर्षांत आपण इतकी प्रगती केली आहे आणि आता २०३०पर्यंत एड्सची साथ माणसाच्या जीवनातून हद्दपार करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. त्यादृष्टीनं आजच्या जागतिक एड्स दिनी 'एचआयव्ही/एड्सच्या साथीची समाजगटांच्या मदतीनं अखेर' असं घोषवाक्य ठरविण्यात आलं आहे आणि या दिनी होणाऱ्या आणि वर्षभर राबविण्याच्या कार्यक्रमांसाठी 'समाजगटच बदल घडवून आणतात' ही मध्यवर्ती कल्पना नक्की करण्यात आली आहे. ती प्रदीर्घ अनुभवावर आधारित आहे. सन २००० ते २०१८ या काळात एकंदर जगात या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण ३७ टक्क्यांनी कमी झालंच, पण एचआयव्हीशी संबंधित आजारांमुळं येणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणातही ४५ टक्क्यांनी घट झाली. औषधांमुळं याच काळात १३ कोटी ६० लाख जीव वाचले. या पार्श्वभूमीवर आता या विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि ज्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे अशांना योग्य औषधोपचार घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी समाजगटच प्रभावी काम करू शकतात, याची जाणीव झाली आहे. हे समाजगट कोणते? तर स्वानुभवांच्या आधारे प्रशिक्षण देणारे मित्र, या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचे गट (उदा. समलिंगी संभोगी, शिरेतून अमली पदार्थ टोचून घेणारे, देहविक्रय करणारे), समुपदेशक, आरोग्यसेवक, दारोदारी जाऊन माहिती देणारे, विविध सामाजिक संघटना आणि तळागाळातले कार्यकर्तें! आज जगात एकंदर तीन कोटी ७९ लाख लोक एचआयव्हीसह नांदत आहेत. सन २०१८मध्ये१७ लाख लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आणि सात लाख ७० हजारजण या विषाणूशी संबंधित आजारांनी मरण पावले. मात्र आज ज्यांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यातील ७९ टक्के लोकांची तपासणी होऊन त्यांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचं निश्चित झालं, त्यातील ६२ टक्के लोकांना औषधोपचार सुरू झाले आणि त्यातील ५३ टक्के लोकांच्या शरीरातील या विषाणूचं ओझं कमी झालं! या यशामागं आरोग्यसेवक, या विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांनी केलेली जागृती यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळंच जागतिक आरोग्य संघटनेनं आता या विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी ज्या विविध सूचना केल्या आहेत, त्यामध्ये या विविध समाजगटांना महत्त्वाचं स्थान आहे.



या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर सबंधिताला अनेक प्रकारची संधिसाधू संक्रमणं (अपॉर्च्युनिस्टिक इन्फेâक्शन्स) होण्याची संभाव्यता मोठी असते. याचं कारण या विषाणूमुळं त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारयंत्रणाच खिळखिळी केलेली असते. उंदीर-घुशींनी घराचा पाया आणि वासे पोखरले तर ते घर जसं सहजपणं पडतं, त्याचप्रमाणं या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला अनेक आजार झटकन होऊ शकतात. क्षय हा त्यातलाच एक रोग. त्यामुळं या विषाणूचा संसर्ग झालेल्यांनी क्षय रोगाची तपासणी करणं आणि त्यावरचे उपचार सुरू करणं अत्यावश्यक असतं. त्यासाठी वरील समाजगटांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सामाजिक गटांच्या अशा विविधांगी कार्यातूनच या विषाणूच्या प्रसाराला रोखता येईल आणि ही साथ थांबविता येईल, असा विश्वास आता वाटू लागला आहे. तीन दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सुदैवानं या विषाणूवर परिणमाकारक औषधं निघाली, ती किफायतशीर दरात मिळू लागली. विविध देशांच्या सरकारांनी या विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली आणि आता त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात या विषाणूचं नाव इतिहासाच्या पुस्तकापुरतंच राहावं यादृष्टीनं आता प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीनं आजचा '

जागतिक एड्स दिन' महत्त्वाचा आहे.

या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती काय आहे? सन २००१ सालानंतर आपल्या शेजारी देशांपेक्षा भारतानं एचआयव्हीचा संसर्ग कमी करण्यामध्ये लक्षणीय प्रमाणात यश मिळवले. सन २०१० ते २०१७ या काळात या विषाणूचा संसर्ग कमी होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी घटलं आणि एड्सशी संबंधित आजारांनी मरण पावण्याचं प्रमाण ५६ टक्क्यांनी कमी झालं! मात्र २०१७ सालामध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याचं प्रमाण ८० हजारांवरून ८८ हजारांवर गेलं आणि एड्सशी संबंधित आजारांनी मृत्यू येणाऱ्यांची संख्या ६२ हजारांवरून ६९ हजारांवर गेली. आज भारतात २१ लाख लोक एचआयव्हीसह नांदत आहेत. त्यामध्ये अधिक प्रमाण हे स्त्रीवेश्या आणि समलिंगी संभोगी पुरुष यांच्यातच आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये आठ लाख ८८ हजार महिला आहेत. मात्र ज्यांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यापैकी कितीजणांना त्याची जाणीव आहे, याचा तपास २०१७मध्ये केला गेला. तेव्हा असं दिसून आलं की ७९ टक्के लोकांना त्यांची स्पष्ट कल्पना आहे. ज्यांना संसर्ग झालेला आहे, त्यापैकी ५६ टक्के लोक उपचार घेत आहेत. ज्या गर्भार महिलांना या विषाणूचा संसर्ग झालेला आहे, त्यातील ६० टक्के स्त्रिया उपचार घेत आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की या विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे समजल्यानंतर योग्य ते उपचार घेण्यामध्ये महिलाच आघाडीवर (६३ टक्के) आहेत, तर पुरुष (वय वर्षं १५ ते ४९) त्यामानाने मागे (५० टक्के) आहेत.

दुसरं असं की एचआयव्हीचा संसर्ग झालेल्यांना क्षय रोग होण्याची संभाव्यता मोठी असते. सुदैवानं त्यासाठी उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३.४ टक्क्यांवर आली. सन २०१५मध्ये तीच संख्या ३६.३ टक्के होती. याचाच अर्थ असा की या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर एआरटी (अँटिरिट्रोव्हायरल थेरपी) आणि क्षयावर औषध घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. हे प्रमाण वाढणं म्हणजे आवश्यक तो औषधोपचार सहजपणं उपलब्ध होत आहे आणि तो घ्यायलाच हवा, याची जाणीव समाजामध्ये लोकशिक्षणामुळं झाली आहे, याची आश्वासक खूण आहे. आता यापुढंच ध्येय ठरविण्यात आलं आहे. ते असं की सन २०२०मध्ये या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांना त्याची स्पष्ट कल्पना असेल, त्यातील ९० टक्के लोक आवश्यक ती औषधं घेत असतील आणि त्यातील ९० टक्के लोकांमध्ये एचआयव्ही या विषाणूचं प्रमाण कमी करण्यात यश आलेलं असेल! ते उद्दिष्ट साध्य झालं तर या विषाणूचा संसर्ग झालेल्यांपैकी ८१ टक्के लोक औषधोपचार घेत आहेत आणि ७३ टक्के लोकांमध्ये या विषाणूचं प्रमाण कमी झालेलं आहे, असं चित्र तयार होईल. या विषाणूच्या संसर्गाला पूर्ण अटकाव करून २०३० सालामध्ये एड्सची साथ एकंदरच माणसाच्या जगातून हद्दपार करण्याचं जे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे, ते साध्य होऊ शकेल. त्या दिशेनं अन्य देशांबरोबर भारताची पाऊलं पडत आहेत, असं आज उपलब्ध असणारी आकडेवारी आपल्याला सांगत आहे. आपण यशस्वी होवू यात तीळमात्र शंका नाही.

Tuesday, 26 November 2019

DNA n RNA

📙 *मानवी जनुकांचा नकाशा व जैविक रेणू* 📙 
************************************

१९५३ साली डॉक्टर वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची मुलभूत आण्विक रचना जगासमोर मांडली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे मानवी जनुकांचा शोध घेण्यात गेली. अत्यंत चिकाटीचे असे हे काम वैज्ञानिकांच्या आवाक्यात आले, आहे असे २६ जून २००० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जाहीर केले. हा दिवस शास्त्रज्ञांनी *'मानवी उत्क्रांतीचा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस'* म्हणून साजरा केला. हे सारे काय आहे ?

 माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीत सजीवातल्या 'प्राणांचे' अस्तित्व असते. प्रत्येक पेशी तेच तेच अन्न मिळवते व बिनबोभाट कामही करत राहते. प्रत्येक पेशीचे हे काम शिस्तीत आणि इतरांच्या जोडीने जनुकांच्या इशाऱ्यावर चाललेले असते, ज्या पेशीत विभाजनाची क्षमता असते, त्यांच्यातील केंद्रक हा गोलाकार भाग असतो. सूक्ष्म नळ्या व पापुद्रे यांनी बनवलेली कोशिकांगे पेशीत असतात. यांना 'ऑर्गॅनेल्स' म्हणतात. त्यांपैकीच एक म्हणजे सूत्रकणिका म्हणजे मायटोकॉंड्रिया. केंद्रक व सूत्रकणिकेत आपली जनुके म्हणजेच डीएनएचे (डीऑक्सि रायबोन्यूक्लिक अॅसिड) विशिष्ट तुकडे एका पातळशा पडद्याआड बंदिस्त असतात.

शरीरातल्या सगळ्या पेशींच्या केंद्रांमध्ये डीएनएचा रेणू सारखाच असला, तरी तो ज्या पेशीत असतो, जी पेशी घडवणार असते, त्यानुसार त्याचे गुणधर्म प्रकट होतात. गर्भावस्थेच्या अगदी प्राथमिक स्थितीतच अवयवांचे अस्तित्व जाणवयाच्या आधीच साऱ्या पेशींनी आपापसात कोण बनायचे हे ठरवलेले असते. त्या पेशींची गर्भातली जागा आणि नियंत्रक जनुकांचा प्रभाव यानुसार पेशी ऊती अवयव संस्था शरीर बनते. त्यांमध्ये काही जनुके मुख्य बटणाची भूमिका बजावतात, तर काही विशिष्ट भागाच्या बटणाची. अशा पद्धतीत गर्भावस्थेपासून व त्यानंतरही असंख्य जनुकीय बदल नियंत्रितरित्या होतात व शरीराचे संवर्धन होत राहते. पेशींचे विभाजन होताना त्यांच्यातील डीएनए रेणूसुद्धा आपल्या दोन प्रती बनवतो. त्यातून पहिल्या पेशीचे सारे गुणधर्म दुसऱ्या पेशीकडे पोहोचतात. डीएनएचे घटक शरीररचनेतील अत्यावश्यक प्रतीने बनवतात. डीएनएमधील  (एटीजीसी) अॅडीनाईड, थायमाइन, ग्वानाइन, सायटोसिन या चार रासायनिक घटकांच्या विशिष्ट क्रमवारीत आनुवंशिकतेचा सारा अर्थ सामावलेला असतो. अत्यावश्यक अमिनो अॅसिड अशा प्रथिनांचा विशिष्ट क्रम विशिष्ट प्रथिन बनवतो. हा बदलला वा चुकला, तर त्यातून बनणारे प्रथिन, पेशी, अवयव हे सारे दिसण्यात, वागण्यात बदलू शकते.

 डीएनएचा रेणू इतर काही घटकांबरोबर लांबलचक दोऱ्याच्या गुंडाळीसारखा मुडपून, दुमडून वेढे घेत रंगसूत्रांच्या (क्रोमोझोम) स्वरूपात केंद्रात आढळतो. माणसाच्या पेशीत प्रत्येकी ४६ रंगसूत्रे असतात. त्यातील २३ आईकडून तर २३ वडिलांकडून घेतल्यावर दोघांचीही जनुके मुलांच्या व मुलीच्या पेशीत येतात. अशाप्रकारे प्रत्येक पेशीतील ४६ रंगसूत्रे व त्यावरची २५ ते २७ हजार जनुके या साऱ्याला 'जीनोम' असे म्हटले जाते.

समजा पुस्तकातील अक्षरांची उपमा द्यायची ठरवली तर हे २५ हजार अक्षरांचे पुस्तकच बनते. अक्षरांचा क्रम बदलला, तर अर्थ बदलतो, अर्थ बदलला तर अनर्थ होतो. म्हणजेच पेशीपासून बनलेले अवयव कमी प्रतीचे, चुकीचे काम करू लागतात. या बदलाला 'म्युटेशन' असे म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच जनुकांच्या नकाशामध्ये या प्रत्येक अक्षराची जागा त्याचे काम व त्याचे निरोगी अवस्थेतील सर्वसाधारण क्रम नोंदवला गेला आहे. यात बदल आढळला, तर तो डीएनएच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेत शोधता येतो. त्यातून आजाराचे, दोषांचे स्वरूप कळते. डीएनए चाचणी केल्यास अनुवंशिकतेच्या म्हणजेच जनुकांच्या वरून मुलाचे वडील व आई यांची निश्चिती करणे आता शक्य झाले आहे. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत ही सोय झाली आहे. जनुकांचा नकाशा म्हणजे त्या त्या जिवांसंबंधातील एकत्रित संकलित संपूर्ण माहिती. कुठेही जपून ठेवता येण्याजोगी.

 जैविक रेणूंची बनलेली डीएनए व आरएनए म्हणजेच डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड व रायबोन्यूक्लिक अॅसिड हे प्रथिनांच्या साखळीने बनलेली असतात. जीवनाला आवश्यक अशी वीस अमायनो प्रथिने आहेत. याआधी पाहिलेल्या चारांचा (एटीजीसी) यात समावेश होतो. चयापचयाशी संबंधित प्राथमिक गोष्टींवर नियंत्रण व सहभाग हे त्यांचे सततचे काम. अन्नघटकातून आपण रोज त्यांची कमतरता भरून काढत असतो. या विसांपैकी कोणतेही एक कमी पडले, तर विशिष्ट लक्षणे सुरू होतात व आजाराला निमंत्रण मिळते. आरएनएचे काम पेशीतील प्रथिनांचा संचय राखणे हे असते. 

प्रत्येक जैविक रेणूमध्ये अमायनो घटक (-NH2) समूह व कार्बोक्झिल समूह (-COOH) असे असतात. अमायनो अॅसिडच्या रेणूंच्या साखळीने प्रीथिने बनतात. या साखळीतील छोटेमोठे असंख्य असे हजारांहून जास्त घटक असू शकतात. जी प्रथिने निव्वळ अमायनो अॅसिड बनतात त्यांना साधी सिंपल प्रथिने म्हणतात, तर अन्य बहुतेक कर्बोदके, फाॅस्फेट्स यांच्या बरोबरची संयुगे असतात.

Wednesday, 13 November 2019

मधुमेह

*१४ नोव्हेंबर*

*जागतिक मधुमेह दिन*

प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकाला मधुमेह, ६६ टक्के मुलांच्या रक्तात अतिरिक्त साखर, प्रत्येक तीन मधुमेहींमध्ये एक निराशाग्रस्त.. जागतिक मधुमेह दिनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या नावाखाली गेल्या काही दिवसांत असे अनेक पाहणी अहवाल प्रसिद्ध केले जात आहेत. मात्र ही जागृती सरकार किंवा सामाजिक संस्था वा सरकारी रुग्णालयांकडून नव्हे तर आंतरराष्ट्रीय औषध कंपन्या, देशभरात जाळे असलेल्या प्रयोगशाळा तसेच प्रसिद्धीशरण काही डॉक्टरांकडून सुरू आहे. भारतीयांना मधुमेहाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आसुसलेल्या या संस्थांकडून या अहवालाच्या आडून स्वार्थच साधण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

मधुमेहाचे देशातील वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे. शहरी भागांतील श्रीमंत व्यक्तींचा मानला जाणारा हा आजार ग्रामीण भागांतही पोहोचत आहे व त्यासाठी जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत. मधुमेहाबाबत आजही अज्ञान असल्याने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपायांची जागृती होणे गरजेचे आहे. मात्र या दिनाचा आधार घेत स्वतची तुंबडी भरण्यासाठी अनेक कॉर्पोरेट कंपन्या, औषध कंपन्या, प्रयोगशाळा सरसावल्या आहेत आणि जनसंपर्क कंपन्यांना हाताशी धरत प्रसिद्धी माध्यमांकरवी विविध भयचकित करणाऱ्या पाहण्यांचे निष्कर्ष गेल्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

जनजागृती न करता भीती निर्माण करून त्यातून नफा कमावण्याचा हा उद्योग आहे. मधुमेहाला कारणीभूत ठरणारे आहार, व्यायाम, जीवनशैली याबाबत जागृती न करता साखरेशी नाते जोडून त्यातून औषधे तसेच उत्पादने खपवण्यासाठी या पाहण्यांचे घोडे दामटले जाते. मुळात या पाहण्यांना शास्त्रीय निकष नसतो. तुम्ही वर्षभरात कधी निराश झाला होता का, अशा प्रकारची प्रश्नावली वापरून निराशाग्रस्त माणसांची पाहणी केली तर आपण सर्वच निराशाग्रस्त ठरतो. त्यामुळे मधुमेहाबाबत जागृती व भीती यातील फरक समजून घेतला पाहिजे, असे वर्धा येथील सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. एस. पी. कलंत्री यांनी सांगितले.

मधुमेहच नाही तर अनेक आजारांचा बाऊ करत ग्राहकांना भीती घातली जाते. वर्षांला तब्बल ऐंशी पाहण्यांचे पॅकेज देणाऱ्या प्रयोगशाळाही आहेत. मुळात यापैकी ८० टक्के पाहण्यांची रुग्णाला गरजच नसते. दहामध्ये एखाद्या पाहणीतील निष्कर्ष थोडे पुढे- मागे होऊ शकतात. मात्र त्याचा बाऊ करत रुग्णाला अधिकाधिक पाहण्या व त्यानंतर उपचारांसाठी तयार केले जाते.

हृदयरुग्णांवरील पन्नास टक्के अ‍ॅन्जिओप्लास्टी निर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाईकांच्या मानसिकतेचा फायदा घेऊन या काही लाखांच्या शस्त्रक्रिया होतात, असेही ते म्हणाले.

अहवालांचा फुगा आणि वास्तव

’ पाहणी – १५ वर्षांपर्यंतच्या ६६ टक्के मुलांच्या रक्तत अतिरिक्त साखर.

’ वास्तव – भारतात लहान मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण ०.५ टक्क्यांहून कमी आहे. ज्या प्रयोगशाळेने ही पाहणी प्रसिद्ध केली तिथे २०१२ ते २०१४ या वर्षांमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले. त्यातही या तीन वर्षांत एकाच मुलाचे किती वेळा नमुने तपासणीसाठी आले याचा कोणताही उल्लेख पाहणीत नाही. त्यामुळे आजारी मुलांच्या पाहणीतून निष्कर्ष काढून तो सरसकट सर्व मुलांना लावला गेला आहे.

सहा भारतीयांमागे एक मधुमेही

चाळीशी पार केलेल्या शहरी भागांतील व्यक्तींसाठी ही पाहणी साधारणपणे लागू होते. मात्र त्याचा कोणताही उल्लेख केला जात नाही. चाळीस वर्षे पूर्ण केलेल्या लोकसंख्येचा विचार करता शहरी भागात साधारणत १२ ते १५ टक्के तर ग्रामीण भागात ७ ते १० टक्के लोकांना मधुमेह असण्याची शक्यता आहे.

****

तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त

दर तीन मधुमेहींमागे एक निराशाग्रस्त असल्याचा निष्कर्ष कोणत्याही पाहणीअंती निघालेला नाही. विविध पाहण्यांचा एकत्रित अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढण्याची पद्धत वापरून ही माहिती देण्यात आली आहे. निराशा हा आजार शोधण्याची पद्धतीही काही वेळा अशास्त्रीय असू शकते.

अनेक पाहण्या या विशिष्ट गटाशी संबंधित असतात. त्यांना प्रातिनिधिक किंवा शास्त्रीय म्हणता येणार नाही. आहार, विहार यासोबत योग्य औषधांमुळे मधुमेह काबूत ठेवता येतो.


Project Report on Viral Diseases

Project Report on Viral Diseases Introduction towards Project Report on Viral Diseases : A virus, in the words of one eminent scientist, can...